Maratha

Monday, June 6, 2011

महाराष्ट्राचे मानबिंदू – संत तुकाराम

अखंड, अनाहत कीर्तनामुळे ज्यांची काया ब्रह्मभूत झाली असे साक्षात्कारी ‘सत्पुरूष’; जगाच्या कल्याणासाठी स्वत:चा देह कष्टवणारे व जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे ‘जगद्गुरू’ आणि भागवत धर्माचा कळस झालेले ‘संतश्रेष्ठ’!

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निभिर्र्ड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे.वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच,तसेच त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदांत वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. ते विटेवरचे सावळे परब्रह्म सगुण साकार होऊन, स्वत:ला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानते.

‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.

एका शुचिष्मंत घराण्यात पुणे जिल्ह्यातील देहू येथे शके १५३० मध्ये (इ. स. १६०८) वसंत पंचमी (माघ शु. पंचमी) या दिवशी त्यांचा जन्म झाला. नुकतीच इ. स. २००८ या वर्षी त्यांच्या जन्माला ४०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्र्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला, परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला.

भामगिरी पाठारी वस्ती जाण केली। वृत्ती स्थिरावली परब्रह्मी।।
सर्प, विंचू, व्याघ्र अंगाशी झोंबले। पिडू जे लागले सकळीक।।
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला। विठोबा भेटला निराकार।।
या शब्दांत त्यांच्या तपश्र्चर्येचे वर्णन केलेले आढळते.

सतत, अनंत, अथांग विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत:करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करणे हेच संत तुकारामांचे जीवन होते. ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत।।’ या वचनावरून पंढरपूरचे त्यांच्या जीवनातील स्थान लक्षात येते. पांडुरंग हेच त्यांचे दैवत होते.

वेद, गीता, भागवत, ज्ञानेश्र्वरी, पुराणांचा त्यांचा अभ्यास होता हे दिसून येते. अस्सल मराठमोळी भाषा हे त्यांच्या रचनांचे मुख्य वैशिष्ट्यहोय. वैराग्याच्या कसोटीवरचा आत्मानुभव अनंत गुणांनी त्यांच्या अभंगवाणीत प्रगट झाल्याचा दिसतो. त्यांच्या रचनांतून श्रीविठ्ठलभक्तीसह संत-गुणवर्णन; कर्मठपणा व अंधश्रद्धेवर प्रहार; दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका; विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक विषय समोर येतात. त्यांच्या काही अभंगांच्या एकेका चरणावरूनही एक समृद्ध आशय आपल्यासमोर येतो.
उदाहरणार्थ,

‘‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।’’
‘‘संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश।।’’
‘‘तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।’’
‘‘महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।’’
‘‘ऐसी कळवळयाची जाति। करी लाभाविण प्रीती।।’’
‘‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।’’
‘‘शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।’’

तुकोबांचे हे अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत, की असंख्य लोकांच्या मुखांतून त्याचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अनेक चरण हे मराठी भाषेतील सुविचारच बनून गेले आहेत. अवघ्या ४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सुमारे ५००० अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागविला.

‘आम्ही जातो आमुच्या गावा। आमुचा राम राम घ्यावा।।’, असे म्हणत तसेच,
सकळही माझी बोळवण करा। परतोनि घरा जावे तुम्ही।।
वाढवेळ झाला उभा पांडुरंग। वैकुंठा श्रीरंग बोलावतो।।
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी।।
अंत:काळी विठो आम्हासी पावला। कुडीसहित झाला गुप्त तुका।।

असे म्हणत ते फाल्गून वद्य द्वितीया शके १५७१ मध्ये (इ. स.१६४९) ब्रह्मलीन झाले. (शके पंधराशे एकाहत्तरी। विरोधक्ष नाम संवत्सरी। फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी। प्रथम प्रहरि प्रयाण केले।। अशी नोंद आढळते.)

श्रीसंत तुकारामांचे सार्थ वर्णन कवी वामन पंडित यांनी पुढील शब्दांत केले आहे.

जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी। म्हणावे कसे हो तया लागी वाणी।।
परब्रह्मरूपी असा जो तुकावा। तयाचे तुकी कोण दुजा तुकावा।।


Thursday, April 28, 2011

महाराष्ट्राचे मानबिंदू – छत्रपती शिवाजी महाराज


निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती। पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।। यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।। आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।। धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर । सावधपणे नृपवर तुच्छ केले।। देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।। हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।। कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला । कित्येकाला आश्रयो जाहला । शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

शिवकाळात स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे समर्थ रामदास यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महानतम व युगप्रवर्तक असे व्यक्तिमत्त्व उपरोक्त परिपूर्ण, आशयघन व वजनदार अशा शब्दांत तोलले आहे. छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाच्या व कार्यकर्तृत्वाच्या प्रत्येक पैलुचा उल्लेख या कवनात केलेला आहे.

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. सुमारे ३०० वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात, गुलामगिरीत खितपत पडला होता. दिल्लीचे मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती. साम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथली घरे-दारे, पीक-पाणी, बायका-पोरी सुरक्षित नव्हत्या. याच काळात शहाजीराजे भोसले व जिजामाता यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी, १६३० रोजी, (संदर्भ : श्री राजा शिवछत्रपती, गजानन मेहेंदळे, डायमंड पब्लिकेशन्स) पुणे जिल्ह्यातील, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. वडिलांचा जाहगिरीचा प्रदेश बंगळूरचा (कर्नाटक) असल्यामुळे शिवबांची जडण-घडण त्यांच्या आई जिजाबाईंच्या सहवासात व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली. रामायण, महाभारत या गोष्टींचे शिवबांवर लहानपणापासून संस्कार झाले. या गोष्टींच्याच माध्यमातून त्यांची स्वराज्य प्रेरणा जिजाबाईंनी जागृत केली. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी लहानपणीपासून मोठ्या कुशलतेने केला. त्याचबरोबर लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी याबाबतीतही शिवबा पारंगत झाले.

मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर त्या जाहगिरीचा ताबा जिजाबाईंनी घेतला. जिजाबाईंनी त्याच ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवून, लोकांना एकत्र करून पुन्हा पुणे हे गाव वसवलं. याच काळात जाहगिरीच्या कारभाराच्या निमित्ताने शिवाजी राजांचा संबंध इथल्या १२ मावळांमध्ये आला. या ठिकाणीच त्यांना प्रथम बालमित्र व नंतर स्वराज्याचे शिलेदार मिळाले. या काळातच त्यांचे नेतृत्वगुणही फुलायला लागले. एका स्त्रीवर अत्याचार करणार्‍या एका गावाच्या पाटलाला त्यांनी हात-पाय तोडण्याची शिक्षा याच काळात सुनावली. आपल्या दक्ष न्यायव्यवस्थेचे उदाहरण रयतेसमोर ठेवले व स्वराज्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास ते समर्थ असल्याचेही सिद्ध केले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी रायरेश्र्वराच्या पठारावर शिवलिंगाला स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. या वेळी सोबत त्यांचे जिवाभावाचे सवंगडी-मावळे होतेच. तोरणा जिंकून त्यांनी जणू स्वराज्य स्थापनेचे तोरणच बांधले. तोरण्यानंतर पुरंदर काबीज करणे, फत्तेखानाबरोबरची लढाई यामुळे शिवरायांचा आत्मविश्र्वास व निर्धार या दोन्ही गोष्टी वाढत गेल्या. पण त्यांची खरी परीक्षा झाली ती शहाजीराजांना कैद झाली त्या वेळी! शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्राचा उपयोग करून, दिल्लीच्या बादशाहकरवी आदिलशाहवर दबाव आणून त्यांनी आपल्या मुत्सद्दी राजकारणाचे दर्शन घडवले.

त्यानंतरच्या काळात अफझलखानाच्या रूपाने महाराष्ट्रावर खूप मोठे संकट आले. हजारो गावे खानाच्या सैन्याने जाळली, हजारो मंदिरं नष्ट केली आणि रयतेवरही खूप अन्याय केले. पण महाराजांनी न घाबरता, न डगमगता त्याचा सामना करण्याचे ठरवले. स्वराज्याचे आपण पालक आहोत ही भावना प्रबळ होत गेली. त्यातच कान्होजी जेधे व इतर अनेक सरदारांनी केलेला त्याग व पराक्रम यातून कृतज्ञतेची आणि जबाबदारीची भावना प्रबळ होत गेली. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून इतिहासात नवा अध्याय लिहिला. ‘अफझलखान चाल करून आला, त्याला महाराजांनी शिताफीने प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला बोलावले आणि धाडसाने खानाला संपवले.’ – या वाक्यांमध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा, अभ्यासकांना आश्र्चर्य वाटेल असा आणि आजही मार्गदर्शक ठरेल असा मोठा इतिहास सामावलेला आहे. खानाला भेटतानाचा गणवेश, खानाचा देह (उंची, जाडी), स्वत:ची उंची, `काय झाल्यास काय करायचे’ याच्या पर्यायांचा अभ्यास, सोबतीच्या माणसांची निवड, खानाचा खात्मा केल्यानंतर त्याच्या सैन्याचा पराभव करण्यासाठीचे नियोजन, त्यासाठीचा गनिमी कावा, मोहीम अयशस्वी झाली अन्‌ खुद्द शिवरायांना दगाफटका झाला तर पुढे काय करायचे याचे पूर्ण नियोजन – या सर्व घटकांचा तपशीलवार विचार महाराजांनी त्या प्रसंगी करून ठेवला होता. शाहिस्तेखानाची पुण्यात लाल महालात कापलेली बोटे, पुढील काळात आग्र्याहून केलेली सुटका हे सुप्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंगही छत्रपती शिवरायांच्या गुणांची साक्ष देतात.

स्वराज्याची सीमा दक्षिणेत तुंगभद्रेपर्यंत तर उत्तरेत सातपुड्यापर्यंत त्यांनी नेली होती. लढाईच्या काळात त्यांनी कधी रयतेला त्रास दिला नाही, की मराठी सैन्याने कुणाच्या स्त्रियांवर अत्याचार केला नाही. स्वत:च्या सैन्यासमोर त्यांनी आदर्श ध्येयवाद, नीतिमूल्ये व स्वराज्यनिष्ठा ठेवल्यामुळे मराठी सैन्यामध्ये सदैव आवेग, आवेश आणि उत्साहाचे वातावरण असायचे!

स्वराज्यनिष्ठा व पराक्रम यांसह सैन्य उभे करणे, विविध आक्रमणांना तोंड देणे, लढाया यशस्वी करत गडकोट काबीज करणे हे करत असतानाच, दुसर्‍या बाजूला शिवरायांची प्रशासनात्मक व रचनात्मक कामेही चालूच असत. शिवाजीराजांनी एक आदर्श शासनव्यवस्था उभी केली. सैन्याचा पगार केंद्रीय पद्धतीने देणे, सरदारांच्या बदल्या करणे, शेती व शेतसार्‍याबद्दल यंत्रणा लावणे, भूक्षेत्रानूसार शेतसारा निश्र्चित करणे, नैसर्गिक आपत्तींच्या काळात प्रसंगी शेतसारा माफ करणे अशा अनेक महत्त्वाच्या व्यवस्था त्या काळात सुरू झाल्या. ६ महिने स्वराज्याच्या सैन्यात नोकरी व ६ महिने शेती करणे ही शिलेदारी व्यवस्था सुरू करून महाराजांनी प्रजेला २ वेळची भाकरी मिळवण्याची आणि देशसेवा करण्याची संधी एकत्रितपणे दिली. त्यामुळे प्रजेला आर्थिक व सामाजिक सुरक्षितता प्राप्त झाली, तसेच स्वराज्याबद्दलची प्रजेची निष्ठा अधिकाधिक घट्ट होत गेली.

सूर्याजी काकडे, वाघोजी तुपे, बाजी पासलकर, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, … यांसारख्या हजारो मावळ्यांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून स्वराज्याचे स्वप्न साकार केले. त्यामागे फार मोठा ध्येयवाद होता, राष्ट्रवाद होता. आधुनिक शस्त्रास्त्रे, वेगवान घोडदळाचा विकास व कोकण किनारपट्टीकडून अरब, हपशी, सिद्धी, पोर्तुगीज यांपासून संरक्षण करण्यासाठी केलेली आरमाराची स्थापना या महत्त्वाच्या घटकांचेही त्यामध्ये योगदान होते. शत्रूचे मर्म आणि मर्यादा ओळखून त्यावर अचानकपणे हल्ला करून, वार्‍याच्या वेगाने चाल करून शत्रूची दाणादाण उडवून देण्याच्या अनोख्या तंत्रामुळे त्यांनी दिलेरखान, शाहिस्तेखान, अफझलखान व इतर अनेक सरदारांची पळताभुई थोडी केली .स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक आक्रमणापासून त्यांनी प्रजेचे रक्षण केले.

जगद्‌गुरू संत तुकाराम, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज ही तीन अलौकिक व्यक्तिमत्त्वे एकाच काळात महाराष्ट्रात वास्तव्यास होती. महाराष्ट्राचा तो सुवर्णकाळच! संत तुकाराम व छत्रपती शिवराय यांच्या भेटीचे उल्लेख इतिहासात आढळतात. (काही अभ्यासक या दोहोंची भेट १६४७ साली झाल्याचे सांगतात, तर काही अभ्यासक १६४९ मध्ये ही भेट झाल्याचा अंदाज व्यक्त करतात.) संत तुकारामांचे कीर्तन ऐकून मूळातच सत्‌प्रवृत्तीचे व आध्यात्मिक वृत्तीचे असणारे छत्रपती यांच्या मनात विरक्तीचे विचार प्रबळ झाले. पण संत तुकोबारायांनी छत्रपतींना `आम्ही जगाला उपदेश करावा। आपण क्षात्रधर्म सांभाळावा’ असा उपदेश केला. शिवरायांनी या आज्ञेचे पुढील काळात तंतोतंत पालन केले.

स्वराज्य खूप मोठे झाले होते. अशा वेळेसच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्र धर्माच्या पुनरुत्थानाचे बीजच ठरले. १६७४ सालच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये त्यांचा राज्याभिषेक काशीच्या गागाभट्टांकडून झाला. महाराज छत्रपती झाले. हा महाराष्ट्राच्या व भारताच्याही इतिहासातील एक सर्वोच्च पराक्रमाचा, आनंदाचा व अभिमानाचा क्षण होय!

छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा… असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी - बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले, - पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला, - साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला, - स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले; - महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले, - योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला, - आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला; - सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था… अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या. - सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली; - राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला. - तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला. या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात!

सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. महाराष्ट्र धर्म वाढवण्याची स्फूर्ती देते.

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून आले. याच काळात त्यांच्या तब्बेतीवरही फार परिणाम झाला. सततच्या मोहिमा, दगदग यामुळेच त्यांना ज्वराचा त्रास वाढतच गेला. यातच दि. ०३ एप्रिल, १६८० रोजी त्यांचा मृत्यू झाला. एका विशाल पर्वाचा अंत झाला.

मानवी देहाच्या मर्यादेत राहून शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती आणि इच्छाशक्ती यांच्या क्षमतेच्या योग्य वापराची अंतिम मर्यादा गाठून शौर्य, शील, नीतीमत्ता, दूरदृष्टी, धाडस, प्रसंगावधान यासारख्या अनेक सद्गुणांचा सर्वकालीन श्रेष्ठ आदर्श निर्माण करणारे शिवराय हे मनुष्याच्या अंगभूत शक्ती जाग्या होऊन योग्य कार्यात वापरल्या गेल्या तर काय चमत्कार घडतो याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. अलौकिक यश कसे मिळवावे हे शिकविणारा हा महाराष्ट्राचा देव महाराष्टीय लोकांच्या मनात अढळ आणि अमर झाला आहे.

शिवचरित्र हे महाराजांच्या मृत्यूपर्यंत थांबत नाही. पुढच्या काळात तब्बल ३० वर्षे या महाराष्ट्राला स्थिर व एकमेव असे नेतृत्व नसतानाही, स्वत: औरंगजेब महाराष्ट्रात आला असतानाही हे स्वराज्य समर्थपणे त्याच्याशी लढले व मुघल सम्राटाला इथेच, याच भूमीत प्राण ठेवावे लागले.

शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी समृद्ध, संपन्न असे ‘आंनदवनभुवन’ च निर्माण केले होते. त्या आनंदवनभुवनाचे वर्णन समर्थ रामदासांनी पुढील शब्दात केले आहे. हे काव्य म्हणजेच छत्रपतींनी पार पाडलेले ‘इतिकर्तव्य’ होय.

स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी, तीर्थासी तुळणा नाही। आनंदवनभुवनी।। त्रैलोक्य चालील्या फौजा, सौख्य बंध विमोचने, मोहीम मांडिली मोठी। आनंदवनभुवनी।। येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमे , संतोष मांडला मोठा। आनंदवनभुवनी।। भक्तांसी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा, भक्तासी दिधले सर्वे। आनंदवनभुवनी।। येथूनी वाचती सर्वे ते ते सर्वत्र देखती, सामर्थ्य काय बोलावे। आनंदवनभुवनी ।। उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, जप-तप अनुष्ठाने आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला। आनंदवनभुवनी।।

Wednesday, April 27, 2011

Save The Earth Campaign


Hi All,

This is indeed an old article. But i just thought of sharing it all over again to appreciate the cause.

Since Japan has faced such a devastated terrifying disaster, we all need to take small steps to save our planet.

Ofcourse, its time to take leaps now but start-off with doing a cause. Try all the possible ways that could help us and also help the people out in Japan.